धुळे | गौतम सोनवणे
धुळे जिल्हा परिषद कार्यालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत एक गंभीर प्रकार समोर आल्याची चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा रक्षकांकडून पूर्वीच्या कंत्राटदार कंपनीचा गणवेश वापरून ड्युटी बजावली जात असल्याचे आढळून आले.
सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी जिल्हा परिषदेची सुरक्षा व्यवस्था रॅपिड सिक्युरिटी कंपनीकडे होती. त्यानंतर संबंधित कंत्राट समर्थ सर्विसेस या कंपनीकडे देण्यात आले. मात्र, नवीन कंत्राट लागू झाल्यानंतरही काही सुरक्षा रक्षक पूर्वीच्या रॅपिड सिक्युरिटी कंपनीचा गणवेश परिधान करून कार्यरत असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विचारणा करण्यात आल्यानंतर संबंधितांकडून जिल्हा परिषदेकडून एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यासंदर्भातील अधिकृत कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे समजते. तसेच, गणवेशाबाबत प्रश्न उपस्थित होताच काही सुरक्षा रक्षकांनी तातडीने शर्ट बदलल्याची माहितीही समोर आली आहे.
या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, कंत्राट अंमलबजावणी आणि प्रशासनाच्या देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासन, समर्थ सर्विसेस तसेच संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका मिळाल्यानंतर प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
