मॉर्फ फोटो आणि आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात जामनेर पोलिसांना निवेदन
आपला बातमीदार | गजानन तायडे
राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्याविषयी सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित व्यक्तींविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना निवेदन सादर करण्यात आले.
यापूर्वीच या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आलेली असून, जामनेर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेली एन.सी. (NC) पुढील तपास व कार्यवाहीसाठी जळगाव येथील दाखल गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार असला तरी खोटी माहिती पसरवणे, मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करणे, सोशल मीडियाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीची जाणीवपूर्वक बदनामी करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य आहे. अशा प्रकारच्या समाजविघातक प्रवृत्तींवर कायद्याने कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील, माजी तालुकाध्यक्ष मयूर पाटील, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितूभाऊ पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक तुषार चौधरी, रवींद्र झाल्टे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
