गजानन तायडे | आपला बातमीदार
जामनेर (प्रतिनिधी)
शहरातील भुसावळ रोड परिसरातील “गजानन ट्रेडर्स”(जुने ) या बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात किरकोळ उधारीच्या वादातून ग्राहकावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुकानात टाईल्स, कडप्पे, सिमेंट आदी साहित्याची विक्री केली जाते. या व्यवसायात कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार आणि मिस्त्री यांच्याशी मोठ्या प्रमाणावर उधारीचे व्यवहार होत असतात. याच पार्श्वभूमीवर एका ग्राहकाकडे किरकोळ रक्कम बाकी असल्याने वाद निर्माण झाला.
हा वाद इतका वाढला की दुकान मालकाने संतापाच्या भरात ग्राहकाच्या डोक्यात लाकडी फळीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात ग्राहक गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जखमी ग्राहकास तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
