आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर, प्रतिनिधी :-
वाकी बु. ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमधील कथित अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार, माहिती अधिकार कायद्याचे पालन न होणे आणि ग्रामस्थांच्या मूलभूत समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ अमोल भास्कर सुरवाडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
उपोषणकर्ते अमोल सुरवाडे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, विविध योजनांमधील खर्च, विकासकामांची गुणवत्ता, लाभार्थी निवड प्रक्रिया तसेच ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या कररूपी पैशांचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सुरवाडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडे वेळोवेळी माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मागविण्यात आली. मात्र संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासनाकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली असून, अनेक प्रकरणांमध्ये माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांना कायद्याने मिळालेला माहितीचा अधिकार डावलला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
याशिवाय गावातील पाणीपुरवठा, रस्ते, नाली यांसारख्या मूलभूत सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी असून अनेक कामे अपूर्ण अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणस्थळी ग्रामस्थांकडून भेटी देण्यात येत असून अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजातील पारदर्शकता वाढवून आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी संबंधितांवर कुणाचा छुपा आशीर्वाद असल्याचा संशय असून, प्रशासन योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई का? यावर जनतेचे लक्ष लागून आहे.
या उपोषणामुळे वाकी बु. परिसरातील ग्रामपंचायत कारभार पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार अमोल सुरवाडे यांनी व्यक्त केला आहे.
