आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर, प्रतिनिधी : -
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत जामनेर नगरपरिषदेच्या वतीने कांग नदी परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. नदी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
नदी ही केवळ जलस्रोत नसून आपल्या संस्कृतीचा, पर्यावरणाचा आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तिचे संवर्धन आणि स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अभियानात नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
या महास्वच्छता अभियानात भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, जितेंद्र पाटील, तेजस पाटील, बाबुराव हिवराळे तसेच मुख्याधिकारी नितीन बागुल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी जामनेर शहरातील अनेक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कांग नदी परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची गरज असून भविष्यातही नागरिकांनी स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.
या अभियानामुळे कांग नदी परिसर स्वच्छ होण्यास मदत झाली असून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही साध्य झाले.
