आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर (प्रतिनिधी) –
शहरातील सोनबर्डी परिसरात असलेल्या एका तरण तलावात ७ वर्षीय चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक गणेश पाटील (वय ७) हा मूळचा एकुलती येथील रहिवासी असून सध्या जामनेर शहरातील दर्शन पार्क परिसरात कुटुंबासह राहत होता. दि. ३ मे रोजी संध्याकाळच्या सुमारास तो आपल्या परिवारासोबत सोनबर्डी येथील तरण तलावावर गेला होता.
पोहून झाल्यानंतर कार्तिकच्या वडिलांनी त्याला तलावाजवळील चेंबरच्या जवळ उभे करून कपडे आणण्यासाठी गेले असता, काही क्षणातच कार्तिकचा तोल जाऊन तो त्या चेंबरमध्ये पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेत तो पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तत्काळ धाव घेऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाल्याने कार्तिकचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
