आपला बातमीदार | गजानन तायडे
जळगाव :-
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तीन आरोपींना नागपुरातून अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलाच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका फिर्यादीने घरफोडीची तक्रार दाखल केली होती. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. तपासात आरोपी नागपूर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर गाठून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजू जसपालसिंग, भोला उर्फ विरेंद्र सुखदेव पासवान आणि राजेश पारस शाह यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पो. उ. नि. शरद बागल पो. हे. कॉ.गोपाल गव्हाणे पो. हे. कॉ.उमाकांत पाटील पो. ना.विकास सातदिवे पो. कॉ. प्रशांत परदेशीं पो. कॉ.राहुल वानखेडे पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावत गुन्ह्याचा जलद छडा लावला.
या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे करीत आहे.
