आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर, प्रतिनिधी : -
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जामनेर तालुक्यात अवैध गावठी दारू व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत हातभट्टी धारकांवर धडक मोहीम राबविली. या कारवाईत ८ गुन्हे दाखल करण्यात आले असून सुमारे १ लाख ९८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.
उषा वर्मा, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, नाशिक यांच्या आदेशानुसार तसेच व्ही. टी. भुकन, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत के. एन. गायकवाड, निरीक्षक, चाळीसगाव आणि एस. पी. कुटे, दुय्यम निरीक्षक, बिट क्रमांक ३ यांच्यासह जवान योगेश राठोड यांनी सहभाग घेतला. पथकाने नेरी, शेंदुर्णी, पळासखेडा, नाचणखेडा आणि भागदरा या गावांमध्ये दि. २९ मे ते २ जून दरम्यान सलग कारवाया केल्या.
कारवाईदरम्यान २८५ लिटर गावठी दारू तसेच ४,२६० लिटर कच्चे रसायन (वॉश) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत १,९८,८८० रुपये असून तो घटनास्थळीच नष्ट करण्यात आला. तसेच संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधात अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून परिसरात कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.
