जामनेर (विशेष प्रतिनिधी): गजानन तायडे
जळांद्री बु. ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणात जामनेर पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची परस्परविरोधी भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, स्वतः माहिती देण्याचे आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यानेच नंतर तक्रार निकाली काढण्याची शिफारस केल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
⚫माहिती मागितल्यानंतर सुरू झाली टाळाटाळ
जळांद्री बु. ग्रामपंचायतीमधील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा खर्च, निविदा प्रक्रिया तसेच लेखापरीक्षण अहवालाची माहिती एका नागरिकाने माहिती अधिकारांतर्गत मागितली होती. मात्र, ग्रामपंचायतचे जनमाहिती अधिकारी अमोल देशमुख यांनी माहिती देण्याऐवजी टाळाटाळ केल्याचा आरोप आहे.
अपिलीय अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश
⚫माहिती न मिळाल्याने अर्जदाराने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली.
दि. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सुनावणीस जनमाहिती अधिकारी अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी तथा प्रथम अपिलीय अधिकारी के. पी. काळे यांनी दि. ०९/०२/२०२६ रोजी स्पष्ट आदेश देत, “मागितलेली संपूर्ण माहिती १० दिवसांत विनामूल्य सही-शिक्क्यासह उपलब्ध करून द्यावी,” असे निर्देश दिले होते.
⚫आदेशानंतरही माहिती नाही
अपिलीय अधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असतानाही संबधित ग्रामपंचायत अधिकाऱ्याने अर्जदाराला माहिती न देता “कार्यालयात येऊन अवलोकन करा” असे पत्र पाठवले. यामुळे अर्जदाराने राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर तक्रार दाखल केली.
⚫येथेच सुरू झाला ‘प्रशासकीय खेळ’?
दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकारी के. पी. काळे यांच्याकडेच गटविकास अधिकारी (BDO) पदाचा अतिरिक्त पदभार असल्याने प्रकरण अधिक चर्चेत आले आहे. स्वतःच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित असताना, गटविकास अधिकारी या नात्याने त्यांनी उलट ग्रामसेवकाची भूमिका ग्राह्य धरल्याचे समोर आले आहे.
⚫वरिष्ठांना पाठवला ‘तक्रार निकाली’ काढण्याचा अहवाल
दि. २९/०४/२०२६ रोजी जळगाव जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांना पाठवलेल्या पत्रात, अर्जदाराला माहितीचे अवलोकन करण्यासाठी बोलावण्यात आले होते, असा युक्तिवाद करत “आपले सरकार” पोर्टलवरील तक्रार निकाली काढण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
एकाच अधिकाऱ्याने दोन वेगवेगळ्या पदांवरून घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकेमुळे जामनेर तालुक्यात प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
