जामनेरमध्ये अवैध लाकूडतोड वाढली; तापमानवाढीत भर
आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर (प्रतिनिधी) –
जामनेर शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध लाकूडतोड सुरू असून वन कायद्याची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिवसाढवळ्या झाडांची कत्तल करून लाकूड वाहतूक केली जात असल्याचे चित्र अनेक भागांत दिसत आहे. मात्र वनविभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
सध्या जामनेरमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला असून नागरिक उष्णतेने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत असल्याने तापमानवाढीस आणखी चालना मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत असून भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही भागांत मौल्यवान झाडांची अवैधरित्या तोड करून ट्रॅक्टर व पिकअप मोठ्या वाहनांमधून लाकूड वाहतूक केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या प्रकारामागे आर्थिक देवाणघेवाण होत असेल काय, असा संशयही नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अवैध लाकूडतोड तातडीने थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच वनसंपदेच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिक, वृक्षप्रेमी व पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
