गजानन तायडे | जामनेर
जामनेर पंचायत समिती अंतर्गत काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून प्रवास भत्ता (TA) व महागाई भत्ता (DA) अनधिकृतरीत्या उचलल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासात संबंधित अधिकाऱ्यांनी मासिक दैनंदिनी सादर न करता तसेच दौऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता भत्ते काढल्याचे समोर आले आहे.
पंचायत समिती कार्यालयाने दि. ९ मार्च २०२६ रोजी आदेश काढून या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती गठीत केली आहे. सहायक गटविकास अधिकारी के. पी. काळे यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक प्रशासन अधिकारी के. एन. रावल व कनिष्ठ प्रशासन अधिकारी वाय. जे. तायडे, के. एस. जाधव यांचा समावेश असलेली चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
शासनाच्या नियमांनुसार TA-DA मंजुरीसाठी मासिक दैनंदिनी, दौऱ्यांची पूर्वपरवानगी आणि प्रत्यक्ष कामाची नोंद आवश्यक असते. मात्र या नियमांचे उल्लंघन करून शासकीय निधीचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने चौकशी अपेक्षित असताना प्रक्रिया विलंबित होत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण जाणीवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा प्रशासन वर्तुळात रंगू लागली आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष घालून चौकशी पारदर्शक व वेळेत पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दोष सिद्ध झाल्यास संबंधितांकडून रक्कम व्याजासह वसूल करणे, शिस्तभंगाची कारवाई करणे तसेच आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता चौकशी समितीचा अंतिम अहवाल काय सांगतो आणि प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुशासनाची खरी कसोटी या प्रकरणातून लागणार आहे.
