आपला बातमीदार | नेरी बुद्रुक
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी बुद्रुक येथे एचपीव्ही (HPV) गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. रमेश धापटे उपस्थित होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी राऊत तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल देसले, डॉ. कांचन गायकवाड, डॉ. सुवर्णा पांढरे, डॉ. गिरीश पाटील, डॉ. नामदेव पाटील, डॉ. अश्विनी कुरणकाळ, सोपान राठोड, नीलिमा गवळी, माया बोरसे यांच्यासह सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमादरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व सांगत गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी ही लस प्रभावी असल्याचे स्पष्ट केले. महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, “स्त्रीने प्रथम स्वतःच्या आरोग्याचा विचार केला पाहिजे. स्त्री स्वस्थ राहिल्यास संपूर्ण कुटुंब स्वस्थ राहते.” तसेच मुली व पालकांनी लसीकरणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आरोग्य विभागाच्या उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या मोहिमेमुळे परिसरातील मुलींमध्ये गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत जनजागृती होऊन महिलांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
उद्घाटनपर शिबिरात परिसरातील ५० लाभार्थींनी लस घेतली. जामनेर तालुक्यात ३६९० तर जळगाव जिल्ह्यात ४१,४१६ मुलींना आरोग्य विभागामार्फत मोफत गर्भाशय कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली. विशेष म्हणजे, खाजगी दवाखान्यात या लसीकरणासाठी साधारणतः ३ ते १० हजार रुपये खर्च येतो.
नेरी बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्त एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना जिल्हा परिषद जळगावच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व उपस्थित मान्यवर.
