आपला बातमीदार | सांगवी बुद्रुक (ता. यावल)
ज्योती विद्या मंदिर, सांगवी बुद्रुक येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजामाता जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या औचित्याने रेड रिबन क्लब व ग्रामीण रुग्णालय, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने NCC कॅडेट्ससाठी १०० मीटर धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात NCC अधिकारी श्री. पी. एम. भंगाळे यांनी राष्ट्रीय युवा दिनाचे महत्त्व विशद करत युवकांमध्ये आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती, चारित्र्यनिर्मिती व सेवाभाव निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका” हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धेचे उद्घाटन सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. अतुल फिरके यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग घेत क्रीडास्पर्धेचा आनंद लुटला.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे :
🔹 मुलींच्या गटात वैष्णवी प्रकाश कोळी हिने प्रथम, हेमांगी सुपडू कोळी हिने द्वितीय तर नेहा विकास चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
🔹 मुलांच्या गटात प्रणय भूषण पाटील प्रथम, अंश दिनकर सोनवणे द्वितीय तर ज्ञानेश खिलचंद चौधरी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला.
विजेत्या व सहभागी NCC कॅडेट्सचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. भंगाळे यांनी अभिनंदन केले. यावेळी श्री. वसंत संदानशिव (समुपदेशक, ICTC विभाग), श्री. पवन जगताप (लिंक वर्कर), श्रीमती कांचन चौधरी (समुपदेशक, RKSK), ग्रामीण रुग्णालय यावलचे पर्यवेक्षक श्री. सी. पी. फिरके तसेच भाऊसाहेब सतीश सरोदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व विजेत्या कॅडेट्सना ट्रॉफी व प्रमाणपत्र, तर सहभागी कॅडेट्सना सहभाग प्रमाणपत्र रेड रिबन क्लबच्या वतीने देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार NCC कॅडेट तौसिफ तडवी यांनी मानले.
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त व राष्ट्रप्रेम जागवणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.
