जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणी उपसा करणाऱ्या मोटारींच्या चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, चोरट्यांच्या सक्रियतेमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास मोटारी काढून नेण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याने, शेतीच्या कामावर याचा गंभीर परिणाम होत आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून विहिरीवरील मोटारींची “फिर हेरा-फेरी” होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सिंचनासाठी अत्यावश्यक असलेल्या मोटारी भुरटे चोर सहज काढून नेत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. काही शेतकऱ्यांनी मोटार सुरक्षित ठेवण्यासाठी लोखंडी साखळ्या, कुलूप लावूनही चोरट्यांनी त्या तोडून चोरी केल्याचे सांगितले.
सामरोद–आमखेडा शिवारात भुरट्या चोरांनी दि. ६ जानेवारी २०२६ रोजी घातला असून या चोरीप्रकरणी काही शेतकऱ्यांनी जामनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार आमखेडा देवी येथील युवराज बाबुराव पाटील यांच्या एकट्याच्याच पाच विहिरींवरील मोटरींचे वायरिंग, स्टार्टर व सौर ऊर्जेचे स्टार्टर चोरीला गेले आहेत.
त्याचप्रमाणेधरमचंद फकीरचंद शर्मा, अमृत शामराव पाटील, विक्रम राजाराम चव्हाण, विजयसिंह सुपडु पाटील, अनिल कांबळे, प्रफुल्ल डांगी, शालिक तुकाराम पाटील, पंडित नामदेव पाटील, अल्केश रघुनाथ परदेशी, प्रल्हाद मांगो सुरळकर तसेच अक्षय युवराज पाटील तसेच मागील आठवड्यात खादगाव येथील ही काही शेतकऱ्यांच्या देखील विहिरीवरील वायरिंग व इतर साहित्य देखील चोरट्यांनी लंपास केले आहे.
स्थानिक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “चोर चोरी करून मस्त आहेत, मात्र पोलीस प्रशासन सुस्त आहे. वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने चोरट्यांचे फावत आहे.” अनेकांनी रात्रभर विहिरीजवळ पहारा देण्याची वेळ आली असल्याचेही सांगितले.
या चोरीच्या घटनांमागे संघटित टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अद्याप पोलीस तपासात ठोस धागेदोरे हाती लागले नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी वाढत आहे.
सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला गस्त वाढवण्याची, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणी केली आहे. “शेती आधीच संकटात आहे, त्यात मोटारींची चोरी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे,” अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.
पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई करावी, अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
