आपला बातमीदार | विद्यापीठ, जळगाव
विद्यार्थ्यांना तातडीची आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी स्थापन करण्यात आलेले विद्यापीठाचे हेल्थ केअर सेंटर सध्या गंभीर निष्काळजीपणामुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. केंद्रातील कार्यरत डॉक्टर कामाच्या वेळेतच खुर्चीवर पाय वर करून झोपले असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हेल्थ केअर सेंटरमध्ये सतत डॉक्टर उपलब्ध असावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना अचानक उद्भवलेल्या आरोग्य समस्यांवर तातडीने उपचार मिळू शकतील, असा उद्देश आहे. मात्र, कर्तव्याच्या वेळेतच डॉक्टर झोपेत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तत्काळ वैद्यकीय मदतीत होऊ शकणारा विलंब, चुकीचे मार्गदर्शन, आपत्कालीन परिस्थितीत योग्य उपचार न मिळण्याची शक्यता — हे सर्व मुद्दे या निष्काळजीपणामुळे अधिक गंभीर झाले आहेत. त्यामुळे हेल्थ केअर सेंटरमधील वैद्यकीय व्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणानंतर विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली असून, संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करून योग्य कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आरोग्यसेवा क्षेत्रात जबाबदारी, संवेदनशीलता आणि शिस्त कायम राखणे अत्यावश्यक असल्याचेही विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेमुळे हेल्थ केअर सेंटरच्या कामकाजाची विश्वासार्हता धोक्यात आली असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून आवश्यक सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
