उपसरपंचांचा पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप – “दारू विक्रेत्यांकडून घेतात हप्ते ”
*आपला बातमीदार | गजानन तायडे*
जामनेर तालुक्यातील वाघारी गावात आयोजित ग्रामसभेत शनिवारी वातावरण तापले. सभेच्या सुरुवातीलाच गावातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा जोरदारपणे गाजला.
ग्रामस्थांनी गावात सुरू असलेल्या अवैध देशी व विदेशी दारू विक्रीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामस्थ आणि तरुण ग्रामसभेत उपस्थित राहून दारूबंदीची मागणी करत होते.
या वेळी गावाचे उपसरपंच यांनी थेट पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप करत सांगितले की,
> “गावात उघडपणे दारूविक्री सुरू आहे. गावकऱ्यांनी कितीही तक्रारी केल्या तरी पोलिसांकडून कारवाई होत नाही. काही पोलिस कर्मचारी दारू विक्रेत्यांकडून हप्ते घेतात आणि मुद्दाम दुर्लक्ष करतात.”
त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अनेक ग्रामस्थांनी उपसरपंचांच्या वक्तव्याला समर्थन दिले आणि दारूविक्रीमुळे गावात भांडणे, घरगुती कलह आणि तरुण पिढीचे नुकसान होत असल्याचे सांगितले.
सरपंचांनी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन दारूबंदीबाबत ठराव तात्काळ मंजूर करून पोलीस ठाण्याकडे तक्रार सादर करण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वाघारी गावातील अवैध दारू विक्री प्रकरणात तपास व कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
