आपला बातमीदार न्युज | जामनेर
दि. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शेंदुर्णी येथे संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची झालेली विटंबना या घटनेच्या निषेधार्थ आज दि. 16 ऑगस्ट रोजी जामनेर तालुक्यातील नेरी येथे भीम अनुयायांनी जळजळीत तीव्र निषेध व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केले.
हे आंदोलन जळगाव–पहूर रोडवरील नेरी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील चौकात करण्यात आले. यावेळी गावातील महिला, तरुण व वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध फेरी काढली.
आंदोलनादरम्यान महिलांनी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी केली. तर भीम अनुयायी नेते भगवान सोनवणे व रवी बाविस्कर यांनी या कृत्याला देशद्रोह ठरवत, संबंधित आरोपीवर कडक कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली.
या घटनेमुळे नेरी परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून पोलिस प्रशासनाने पुढील अनुचित घटना टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
