आपला बातमीदार -
शेंदुर्णी (ता. जामनेर)
येथे अज्ञातांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली. पुतळ्याच्या उजव्या हातातील ‘दिशादर्शक बोट’ मोडून टाकण्यात आल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून, गावात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच मोठा जमाव पुतळ्याजवळ जमला. काही ठिकाणी संतप्त नागरिकांनी रस्ता रोको करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तक्रारदाराच्या निवेदनानुसार, ही कृती जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. या प्रकारामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून, ग्रामस्थांनी तातडीने आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.
