३ दिवस उत्खनन ; अखेर नवीन मंदिराचे पुजन
फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची संतप्त भाविकांची मागणी
संतप्त भावानांचा उद्रेक
आबा न्यूज | जामनेर
पहूर , ता . जामनेर ( ता . २९ ) जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी हरवलेले जय सप्तशृंगी मातेचे 'क ' वर्ग दर्जा प्राप्त मंदिर शोधण्यासाठी तीन दिवस उत्खनन करण्यात आले . मात्र वीस फूट खोल खोदूनही मंदिर हाती लागले नसल्याने अखेर जय सप्तशृंगी माता ट्रस्टचे अध्यक्ष यांनी नवीन मंदिर उभारण्यासाठी भूमिपूजन करून घेतले . दरम्यान भाविकांची फसवणूक करणाऱ्या ट्रस्ट विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त भाविकांनी केली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या तीर्थक्षेत्रांना विकास कामांसाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्यातर्फे सुरुवातीला 'क 'वर्ग दर्जा दिला जातो . जशी -जशी भाविकांची संख्या वाढत जाते तसा -तसा संबंधित देवस्थानाचा वर्ग वाढविण्यात येतो . त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये विकास कामांसाठी शासनातर्फे दिले जातात .
परंतु पहुर येथील जय सप्तशृंगी माता निवासिनी ट्रस्टने कोणतेही मंदिर अस्तित्वात नसताना बनावट कागदपत्रे सादर करून प्रशासनाची दिशाभूल करत 'क 'वर्ग दर्जा प्राप्त करून घेतला . खर तर 'क ' हा दर्जा मंदिराला मिळतो . परंतू मंदिरच अस्तित्वात नसताना 'क 'वर्ग मिळाला कसा ? असा प्रश्न संतप्त भाविकांना पडला आहे . संबंधित ट्रस्टला ग्रामपंचायतीने जागेचा मालकी हक्क देखील प्रदान केला असून नमुना नंबर ८ ला तशी नोंद करण्यात आली आहे .
जय सप्तशृंगी मा निवासिनी ट्रस्ट चे मंदिर कोठे आहे ? मंदिरच नाही तर हजारो भाविक आले कसे ? केवळ शासकीय अनुदान लाटण्यासाठीच कागदोपत्री मंदिर उभारून भाविकांची आणि प्रशासनाची देखील दिशाभूल झाली असल्याने संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा , अशी मागणी संतप्त भाविक करत आहेत .
संबंधित ट्रस्टने तीन दिवस उत्खनन करून देखील मंदिर हाती न लागल्याने नवीन मंदिर उभारणीचा निर्णय घेतला आहे .
नुकतेच विजयादशमीच्या शुभ- पर्वावावर समर्थ विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठल केशव राऊत यांच्या हस्ते पूजन करण्यात आले .
मात्र अद्याप कोणतीही कारवाई संबंधितांवर झालेली नसल्याने भाविकांचा उद्रेक होण्यापूर्वीच प्रशासनाने संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाविकांनी दिला आहे .
