जामनेर (प्रतिनिधी)
जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असल्याचे चित्र समोर येत आहे. दारू विक्री, जुगार, मटका, गुटखा तस्करी यांसारख्या बेकायदेशीर व्यवसायांनी पुन्हा डोके वर काढले असून, संबंधित यंत्रणांकडून होणारी केवळ नाममात्र कारवाई यामागे कारणीभूत ठरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी अवैध धंदे उघडपणे सुरू असूनही पोलीस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. अधूनमधून छापेमारी केली जात असली, तरी ती केवळ दिखाऊ कारवाईपुरती मर्यादित राहते. त्यामुळे अवैध व्यवसायिकांचा आत्मविश्वास वाढून त्यांची मुजोरीही दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे.
तसेच, तालुक्यात काही ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरित्या साठा करून त्याची किरकोळ व मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. हा प्रकार अत्यंत धोकादायक असून, अशा अनधिकृत गॅस विक्रीमुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाकडून याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, काही भागांत तर अल्पवयीन मुलांनाही या अवैध धंद्यांच्या विळख्यात ओढले जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. यामुळे समाजात चुकीचे संदेश जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी याप्रकरणी प्रशासनाने कठोर भूमिका घेत ठोस व सातत्यपूर्ण कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा येणाऱ्या काळात अवैध धंद्यांचे प्रमाण आणखी वाढून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
