गजानन तायडे | आपला बातमीदार
जामनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शेतकी संघ व्यापारी संकुलातील एका दुकानाला रात्री अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणावर माल जळून खाक झाला असून व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री च्या सुमारे 8 वाजेच्या सुमारास दुकानातून धूर निघताना दिसताच परिसरातील नागरिकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळातच आगीने विक्राळ रूप धारण केले. यानंतर जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला कळविण्यात आले.
परंतु, अग्निशमन दल घटनास्थळी उशिरा पोहोचल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अग्निशमन बंब वेळेत न आल्यामुळे आग नियंत्रणाबाहेर गेली आणि नुकसान वाढले, अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. काही नागरिकांनी अग्निशमन दलाच्या निष्क्रिय कारभारावर संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, शेंदुर्णी , भुसावळ चे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विद्युत शॉर्टसर्किटची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
या घटनेनंतर व्यापारी व नागरिकांनी नगरपालिकेकडे अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम व तत्पर करण्याची मागणी केली आहे. तसेच, शहरातील व्यापारी संकुलांमध्ये अग्निसुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
