आपला बातमीदार | गजानन तायडे
जामनेर नगरपरिषदेच्या विशेष सभेत नगरविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या सभेत डॉ. प्रशांत भोंडे यांची सर्वानुमते उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेत अनुभवी, अभ्यासू व विकासाभिमुख नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
याच सभेत विश्वासभाऊ पर्वते, प्रल्हादभाऊ सोनवणे व दिपक भाऊ डांगी यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. या तिघांच्या निवडीमुळे नगरपरिषदेत सामाजिक कार्य, प्रशासनिक अनुभव व जनहिताच्या प्रश्नांवर भक्कम भूमिका मांडणारे प्रतिनिधी मिळाल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
डॉ. प्रशांत भोंडे यांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना जामनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य व नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या निवडीप्रसंगी ना. मंत्री गिरीश महाजन व नगराध्यक्षा सौ. साधना ताई महाजन यांच्या मार्गदर्शनामुळेच हे शक्य झाले असल्याची भावना व्यक्त करत, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
निवडीबद्दल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक संघटनांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून जामनेर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
