गजानन तायडे | आपला बातमीदार
जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द ग्रुप ग्रामपंचायतीने आयएसओ मानांकन मिळवून ग्रामविकासात नवा आदर्श निर्माण केला आहे. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हा परिषद मुख्याधिकारी मिनल करणवाल यांच्या हस्ते ग्रामपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. याच वेळी जि. प. मराठी शाळा, गारखेडा खु. येथील डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन करण्यात आले.
हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत पार पडला. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे व ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हा मुख्य उद्देश आहे.
या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यांकन सुशासनयुक्त पंचायत, संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदान, जलसमृद्ध व स्वच्छ गाव, मनरेगा व योजनांचे अभिसरण, सक्षम पंचायत (स्वनिधी) तसेच उपजीविका विकास व सामाजिक न्याय या सात घटकांवर केले जाते. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांची प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येतात.
कार्यक्रमास सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. साधना ताई महाजन, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, गटशिक्षणाधिकारी काळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी उपविभागीय अभियंता जे. के. चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गारखेडा खु. ग्रामपंचायतीने मिळवलेले आयएसओ मानांकन व राबवलेले उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
