जामनेर बस स्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट – महिलांच्या मंगळसूत्रांची चोरी
जामनेर
जामनेरहून भुसावळला जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. यामुळे जामनेर बस स्थानक परिसरातील चोऱ्यांचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा समोर आले असून, स्थानकावर पोलीस सुरक्षा वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
घटनाक्रम:
आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास जामनेर बस स्थानकावर पुणे-भुसावळ बस (क्र. MH.20, BL.4020) उभी होती. याच बसमध्ये जामनेरहून कुऱ्हा (पानाचे) येथे जाणाऱ्या जयश्री पाटील आणि प्रतिभा तायडे या दोन महिला बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रे हिसकावली. चोरी लक्षात येताच या महिलांनी बसमधील प्रवासी, ड्रायव्हर आणि कंडक्टरला झडती घेण्यास सांगितले. मात्र, काहीही हाती लागले नाही.
यानंतर दोन्ही महिलांनी तातडीने जामनेर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बस स्थानकावर चोरीचा सुळसुळाट:
राज्य शासनाने महिलांना एस.टी. प्रवास भाड्यात सवलत दिल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. लग्नसराईमुळे बस स्थानकांवर मोठी गर्दी होत आहे, आणि याच संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. मागील काही दिवसांपासून जामनेर बस स्थानकावर चोरीच्या घटना सातत्याने घडत असून, खिसेकापू, बॅग चोरी आणि दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत.
पोलीस सुरक्षा अभावामुळे चोरट्यांचे फावले:
पूर्वी जुन्या बस स्थानकावर चोरी रोखण्यासाठी पोलीस चौकी कार्यरत होती. मात्र, नवीन बस स्थानक झाल्यापासून तिथे पोलीस कर्मचारी कार्यरत नाहीत. त्यामुळे चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे.
सुज्ञ नागरिकांची मागणी:
बस स्थानकावरील वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी जामनेर पोलीस ठाण्याच्या वतीने नियमित दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.
