जामनेर तालुक्यात गुन्हेगारी वाढते, पोलिस प्रशासन काय करत आहे?
जामनेर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन लुटमारीच्या घटना वाढल्या
गजानन तायडे/ मुख्य संपादक
जामनेर
जळगाव वरून जामनेरकडे येणाऱ्या बसमध्ये वृद्ध महिलेला गुंगीचे औषध देऊन लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिला जामनेर बसस्थानकात उतरल्यावर तिला वांकी रोड परिसरात अज्ञात व्यक्तीने नेले आणि तिच्या अंगावरील दागिने लंपास केले. हा प्रकार महिलेने पत्रकारांशी बोलताना उघड केला.
तालुक्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः एस. टी. बस आणि गर्दीच्या ठिकाणी लुटमारीच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय, आठवडे बाजार परिसरात मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांचे मोबाइल गहाळ होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत, त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
नागरिकांकडून पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, या घटनांवर आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. जामनेर शहर आणि परिसरात गस्त वाढवून संशयितांवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी या घटनांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि जबाबदार गुन्हेगारांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
